जपलं जितकं जपता आलं...


जपलं जितकं जपता आलं
"पुरे झालं आता" मन म्हणतं 
हृदय म्हणतं "धीर धार,
जप जरा अजून,
क्षमता आहे तुझी"
मनाचं ऐकावं की हृदयाचं?

क्षमता आहे म्हणून करत रहावं?
नाती जपावी ...
इतरांची मनं जपावी...
त्यांचा त्रागा जपावा...
जो जसं म्हणेल तसं वागावं,
वेगळं वागल्यावर -
दुखावलेला त्यांचा अहंकार जपावा...
"का आणि किती?" मन विचारतं 
"पर्याय काय?" हृदयाचा प्रश्न. 

कुणाला वाटतं का काही तुझ्यासाठी?
कुणाला दिसते तुझी तळमळ?
कोण जपतं का तुझ्या भावना?
अनावर आलेला राग समजून घेतं का कधी कुणी?
विचारतं कधी कोण तुला "कशी आहेस?"
मनाच्या हा प्रश्नांची उत्तरं नाहीत माझ्याकडे. 

हृदय हळूच म्हणतं "तुझ्या इतकं मोठं हृदय नाही त्यांचं,
दमून गेल्यावर ही ठोके देत रहायला...
इतरांना जपायला, जमवून घ्यायला...
राग त्रागा विसरून हसायला. 
कदाचित त्यांना ही कळत असेल,
त्यांच्या मनाच्या एका इवल्याश्या कोपऱ्यात...
मन ही मोठं लागतं गं असं करायला -
मन दमलं, गहिवरून आलं तरी,
"का जपू" इतकंच विचारतं ...
जपणं मात्र सोडत नाही. 

त्याला ही कळतं गं -
तुझीच माणसं आहेत ती,
तू नाही जपणार तर कोण जपणार त्यांना?"


Return to Main Page

~